क्राईम

आधार कीट सुरू न केल्यास “१५ ऑगस्टला आत्मदहन करणार ! बाऱ्हाळीच्या इस्माईल तांबोळींचा इशारा

मुखेड -(ता. प्रतिनिधी) १२ जुलै २५

मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील रहिवासी इस्माईल जाफर तांबोळी यांनी येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे आपल्या व्यथित परिस्थितीची सविस्तर माहिती देत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
इस्माईल तांबोळी हे २०१२ पासून बाऱ्हाळी येथे महा-ई सेवा केंद्र चालवत असून आधार नोंदणीसाठी अधिकृत कीट ते चालवत होते. मात्र, मागील आठ महिन्यांपासून त्यांच्या आधार संचाला परवानगी मिळत नसल्यामुळे त्यांचा रोजगार थांबला असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तांबोळी यांनी जिल्हा व्यवस्थापक वसीम यांच्यावर अन्यायकारक वागणुकीचे आरोप करत म्हटले की, “आपला ऑपरेटर ब्लॅकलिस्टेड आहे” असे सांगून त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. नवीन ऑपरेटरची कागदपत्रे सादर केल्यानंतरही आधार कीट सुरू करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असा दावा त्यांनी केला.
त्यांनी याप्रकरणी काही वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभाग घेऊन आपली बाजू मांडली असूनही न्याय मिळत नसल्याची भावना पत्रात व्यक्त केली आहे. तसेच, “जर येत्या पंधरा दिवसांत माझा संच कार्यरत झाला नाही, तर मी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करीन,” असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
“आजवर माझ्या कार्यावर कोणतीही तक्रार नाही. पण नांदेडपासून १०० कि.मी अंतरावरून अनेक वेळा कार्यालयात गेल्यावरही न्याय मिळत नसेल, तर आत्मदहना शिवाय पर्याय नाही,” असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाची कार्यपद्धती आणि ई-सेवा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तांबोळी यांच्या निवेदनानंतर प्रशासन याची गंभीर दखल घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button