नांदेड जिल्ह्यात उद्या मतमोजणीलोकसभेसाठी 19 व विधानसभेच्या 165 उमेदवारांचे भविष्य ठरणार
प्रशासन सज्ज, विद्यापीठाच्या ज्ञानार्जन केंद्रात मतमोजणी
किनवट, हदगाव, लोहा तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी पहिली फेरी सकाळी 11 वाजेपर्यंत येण्याचा अंदाज
नांदेड, दि. 22 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेसाठी उद्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वा. पासून मतमोजणी होणार आहे. याठिकाणच्या ज्ञानार्जन केंद्रामध्ये पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर लोकसभा व विधानसभेची मतमोजणी होईल तर किनवट, हदगाव व लोहा या ठिकाणच्या मतमोजणीला तालुक्याच्या ठिकाणी सुरूवात होईल. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी 11 पर्यंत अपेक्षित आहे.
उद्या सकाळी उमेदवारांच्या उपस्थितीत सुरक्षा खोलीत मतयंत्र काढले जातील. त्यानंतर कर्मचाऱ्यांना गोपनियतेची शपथ दिली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. सुरूवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू होईल. सकाळी 8 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात होईल. एकूण 14 टेबलवर मतमोजणीला सुरूवात होईल. नांदेड येथील विद्यापिठात पहिल्या माळयावर खोली क्रमांक 102 मध्ये डावीकडील हॉलमध्ये 85-भोकर, मधल्या हॉलमध्ये 87-नांदेड दक्षिण व उजवीकडील हॉलमध्ये 90-देगलूर विधानसभेची मतमोजणी होणार आहे. हॉल क्र. 106 मध्ये डावीकडील हॉलमध्ये 91-मुखेड विधानसभा, मधल्या हॉलमध्ये 89-नायगाव विधानसभा तर उजवीकडील हॉलमध्ये 86-नांदेड उत्तरची मतमोजणी होणार आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या मजल्यावर हॉल क्र. 206 मध्ये डावीकडील हॉलमध्ये मुखेड, मधल्या हॉलमध्ये नायगाव, उजवीकडील हॉलमध्ये नांदेड उत्तर तर हॉल क्र. 202 मध्ये डावीकडील हॉलमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ, मधल्या हॉलमध्ये 87-नांदेड दक्षिण तर उजवीकडील हॉलमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.
1 हजार 800 कर्मचारी करणार मतमोजणी
लोकसभा व विधानसभा मिळून जवळपास 1 हजार 800 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या अधिनस्त 6 सहायक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला तहसिलदार असतात. याशिवाय प्रत्येक एका टेबलवर चार कर्मचारी असतात. मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक व सेवक अशी ही रचना असते. एका फेरीला मोजणीसाठी अर्धातास लागू शकतो. तथापि प्रत्येक फेरीची मोजणी झाल्यानंतर चार ते पाच ठिकाणी त्याची तपासणी केली जाते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत घोषणा केली जाते. या सर्व प्रक्रियेचे साक्षिदार विविध पक्षाचे मतदान प्रतिनिधी असतात. त्यांची सभोवताल बसण्याची व्यवस्था असते. तर मधल्या भागात बंदिस्त कक्षात मतमोजणी कर्मचारी काम करतात. त्यामुळे मोजणीची पारदर्शता राखल्या जाते.
प्रत्येक विधानसभेची 14 टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी 14 गुन्हीले 6 असे 84 टेबल लोकसभा आणि विधानसभेसाठीही ८४ टेबल असतील. जितकी मतदान केंद्र त्याच्या भागिले 14 यानुसार मतदानाच्या फेऱ्या ठरतात. अंदाजे 24 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
अशा होणार फेऱ्या
किनवट विधानसभेमध्ये 331 मतदान केंद्र आहेत. याठिकाणी 24 फेऱ्या होतील. हदगावमध्ये 337 मतदान केंद्र असून येथे 25 फेऱ्या होतील. भोकरमध्ये 344 मतदान केंद्र आहेत. याठिकाणी 25 फेऱ्या होतील. नांदेड उत्तर मध्ये 359 मतदान केंद्र आहेत येथे 26 फेऱ्या होतील. नांदेड दक्षिण मध्ये 312 मतदान केंद्र आहेत येथे 23 फेऱ्या होतील. लोहा मध्ये 338 मतदान केंद्र आहेत येथे 25 फेऱ्या होतील. नायगाव मध्ये 350 मतदान केंद्र आहेत येथे 25 फेऱ्या होतील. देगलूर मध्ये 351 मतदान केंद्र आहेत येथे 26 फेऱ्या होतील तर मुखेडमध्ये 366 मतदान केंद्र आहेत येथे 27 फेऱ्या होतील.