पूर्वसूचना न देता विष्णुपुरी प्रकल्प धरणाचे दरवाजे उघडले; मोठे नुकसान, १ जणांचा मृत्यू.

▫️शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या (अल्पसंख्यांक) महानगर पदाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व ईतर मागण्यासाठी दिले निवेदन
नांदेड प्रतिनिधी २५ सप्टेंबर
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पातील धरणाचे एकूण १६ दरवाजे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उघडण्यात आल्याने भीषण दुर्घटना घडली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरले असून शेकडो घरे, जीवनावश्यक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे व मौल्यवान वस्तू पाण्याखाली गेल्या. या आपत्तीमध्ये अंदाजे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून सर्वात मोठा धक्का म्हणजे सुरक्षित स्थळी हलविण्याची कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडून राबविण्यात आली नाही. परिणामी शेकडो नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी जीवघेणे प्रसंग अनुभवावे लागले. या दुर्घटनेत दुल्हेशाह रहेमान नगर खडकपूरा भागातील १६ वर्षीय युवक मिन्हाज खान साजिद खान या युवकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जर प्रशासनाने वेळेवर पूर्वसूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान टाळता आले असते. परंतु महापालिका आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप पक्षाने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व सर्वसामान्य पीडितांना तातडीची आर्थिक व संसार उपयोगी साहित्यासाठी मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा इतर सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोईज खान पठाण यांनी दिला आहे.
निवेदन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांना व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी महानगरप्रमुख मोईज खान पठाण,शहेबाज खादरि, (महानगर प्रवक्ता) युवा सेनेचे मक़सूद पटेल लोहगावकर, शिक्षक सेनेचे जैद खान, , हाजी भाई, शैख इब्राहीम उपस्थित होते.



