नांदेडमध्ये डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- ०२ सप्टेंबर २६
आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि पोळा सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शांतता, सौहार्द व सर्व धर्म समभाव राखून उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यंदा ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात मंडळांनी डीजेचा वापर पूर्णपणे टाळून डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी वाहत्या नदीऐवजी कृत्रिम तलावांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नागरिक आणि गणेश मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनातर्फे एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार असून मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले. या आवाहनाला दुजोरादेत आमदार अमर राजूरकर आणि महापौर कविता मुळे यांनीही जास्तीत जास्त इको–फ्रेंडली बाप्पाबसवून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याची विनंती नागरिकांना केली.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील संदेशांची सत्यता पडताळून पाहावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊनये, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे. दुसरीकडे, महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करणे, निर्माल्य व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी संकलन व्यवस्था, पुरेसे पथदिवे आणि विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मनपा अपर आयुक्त गिरीशकदम यांनी दिली. या महत्त्वपूर्ण बैठकीला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपरजिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारीकिरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थितहोते.



