Uncategorized

बोगस दिव्यांग सावधान ; आता एसटी प्रवासातही होणार दिव्यांग तपासणी

नांदेड:- प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६

राज्यात दिव्यांग तपासणीच्या सूचना दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिल्यानंतर यातपासणी मोहिमेला गती आली आहे. आता राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही प्रवासात दिव्यांगांचे यूडीआयडी कार्ड तपासण्याच्या सूचना दिल्या असून, संशयास्पद कार्ड जप्त केली जाणार आहेत.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिव्यांग प्रवाशांना एसटी बसमध्ये सवलत दिली जाते. मात्र, राज्यात अनेक बनावट दिव्यांग आढळत आहेत. काही कर्मचार्‍यांनी तर नोकरीत व बदल्यांमध्येही या दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे. दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी बनावट दिव्यांग शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून दिव्यांगांची तपासणी सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळालाही सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी प्रत्येक जिल्ह्याच्या विभाग नियंत्रकांना परिपत्रक काढून तपासणी बाबत सांगितले आहे. त्यानुसार एसटीने वैश्विक दिव्यांग ओळखपत्र कार्डची (यूडीआयडी) काटेकोर तपासणी करायची आहे. यातून बनावट कार्डधारकांच्या प्रवासाला ब्रेक तर बसेलच, शिवाय बनावट दिव्यांगही सापडणार आहेत.

बनावट, अवैध किंवा चुकीचे कार्ड आढळल्यास दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 नुसार आगार स्तरावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. जप्त कार्डाच्या नोंदी ठेवल्या जाणार असून, दरमहाअहवाल विभागीय कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

प्रवाशांना आवाहन:

“ही तपासणी प्रक्रिया राबवताना प्रवाशांना कोणताही मनस्ताप होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पात्र दिव्यांग बांधवांनी सहकार्य करावे आणि प्रवासावेळी आपले मूळ UDID कार्ड सोबत ठेवावे,” असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button