सामाजिक

मुखेड बस आगार परिसरात खासगी वाहनांचा सुळसुळाट; आगार प्रमुखांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २६ नोव्हेंबर २६

मुखेड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बस आगार परिसरात सध्या अवैध खासगी प्रवासीवाहनांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून, नियमांना धाब्यावर बसवून ही वाहने थेट बस आगाराच्या आत फलाटापर्यंत घुसखोरी करत आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत प्रवाशांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आगार प्रमुखांकडे वारंवार तोंडी तक्रारी देऊन तसेच यापूर्वी माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध होऊनही आगार प्रशासनाने यावर पूर्णपणे कानाडोळा केला आहे.

एस.टी. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच नव्हे, तर थेट आगाराच्या आतमध्ये खासगी जीप,  ओमिनी आणि क्रूझर चालक बिनधास्तपणे वाहने उभी करून प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. यामुळे एस.टी. बसेसना स्थानकात ये–जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत असून महिला,ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. एकीकडे महामंडळ तोट्यात असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे आगार प्रमुखांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे व मौनामुळे एस.टी.चा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे. सुरक्षा रक्षक तैनात असतानाही खासगीवाहनांना थेट आगारात प्रवेश कसा मिळतो, यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

स्थानिक आगार प्रमुखांच्या निष्क्रियतेमुळे मुखेड बस स्थानकाला खासगी वाहनतळाचे स्वरूप आले आहे. तरी, नांदेड विभाग नियंत्रकांनी आणि वाहतूक पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून आगार परिसरातील अवैध खासगी वाहतूक कायमची बंद करावी, तसेच कर्तव्यात कसूर व जाणीव पूर्वकदुर्लक्ष करणाऱ्या आगार प्रमुखांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त प्रवासी वर्गातून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button