आमदार तुषार राठोड यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची नागपुरात कारवाई

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड / मुखेड: २५ नोव्हेंबर २६
मुखेड–कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार तुषार गोविंदराव राठोड यांना फोनवरून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांच्या आत नागपूर येथून अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
नेमकी घटना काय? २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:४० वाजताच्या सुमारास आमदार तुषार राठोड (वय ४८, रा. वसंत नगर, मुखेड) हे मुखेड ते नांदेड असा प्रवास करत होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली, तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आमदार राठोड यांनी दिलेल्या तक्रारी वरून मुखेड पोलीस ठाण्यात भारतीयन्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८(४), ३५१(२), ३५१(३), आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना विशेष पथके नेमून तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध पथके आरोपीचा शोध घेत असताना २३ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय सूत्रांद्वारे संशयित आरोपी नागपूर येथील नंदनवन भागातील हसनबाग परिसरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ नागपूर गाठून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.
बाळासाहेब भास्कर राख (वय २४, व्यवसाय: शिक्षण, मूळ रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि.जालना; सध्यारा. हसनबाग, नंदनवन, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी मुखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तपासी अधिकारी उपनिरीक्षक संदीप यामावार यांनी त्याला मुखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक महेश कोरे आणि पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकते यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



