सामाजिक

संविधान दिन विशेष परिसंवाद उत्साहात संपन्न; संवैधानिक मूल्यांचे जतन व शिक्षणाच्या समान संधीवर विचारमंथन

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- २७ नोव्हेंबर २६

ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU), मुखेड तालुका शाखेच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला विशेष परिसंवाद अत्यंत उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांचा तालुका अध्यक्ष ॲड. गजानन गोपतवाड, सचिव ॲड. अंतेश्वर गोगे आणि अक्षय गायकवाड यांच्या हस्ते ‘भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची’ प्रत भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ॲड. संजय भारदे यांनी ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीसमोरील सद्य आव्हाने’ या विषयावर सखोल विचार मांडले. त्यांनी संविधानाची मूलभूत मूल्ये, लोकशाही व्यवस्था, नागरिकांचे मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संवैधानिक संस्थांचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले.

दुसऱ्या सत्रात नगरपरिषद मुखेडचे नगरसेवक ॲड. विजयकुमार कोत्तापल्ले यांनी ‘शिक्षणाचे बाजारीकरण : आजच्या काळातील आव्हाने’ या विषयावर प्रकाश टाकला. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण, त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणी आणि शिक्षणातील असमानता यावर भाष्य करत, सर्वांना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची आज नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण विचारमंथनातून संवैधानिक मूल्यांचे जतन, लोकशाहीचे बळकटीकरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व उपस्थितां समोर आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुलराज बेळीकर यांनी केले, तर ॲड. शंकर बादावाड यांनी ऑल इंडियालॉयर्स युनियनच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्रमुख वक्ते आणि सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी ॲड.एम.बी. कदम,ॲड. गजानन हिवराळे,ॲड.शफी सय्यद,ॲड.अनिल लष्करे,ॲड.प्रमोदकांबळे,प्रदिप कांबळे,जोंधळे यादींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button