शैक्षणिक

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार! मसलगा जि. प. शाळेची छत गळती; विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मसलगा/कंधार) :३० जुलै २६

 कंधार तालुक्यातील मसलगा येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसाचे पाणी थेट वर्गात गळत आहे. या गळक्या छतामुळे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याची मोठी शक्यता निर्माण झाली असून, शाळेच्या या दयनीय अवस्थेचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शाळेच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्यामुळे संपूर्ण वर्गात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘एका हातात पाटी-पुस्तक घ्यायचे की गळणारे पाणी भरायचे?’ असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाळेची भयानक अवस्था स्पष्टपणे दिसत असून, शिक्षणाचे पवित्र मंदिर आता विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळा दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मग हा निधी नेमका गेला कुठे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि पालक विचारत आहेत. उद्या जर हे जीर्ण झालेले छत कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडली आणि निष्पाप विद्यार्थ्यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले, तर याला जबाबदार कोण? झोपलेले प्रशासन, कुंभकर्णी झोपेत असलेला शिक्षण विभाग की स्थानिक लोकप्रतिनिधी?

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शाळेची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button