गोरक्षकांच्या तत्परतेमुळे जखमी वासराला जीवदान.

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- १९ ऑगस्ट २६
दि १८ ऑगस्ट रोजी दुपारी शासकीय गोडाऊन परिसरात एका गाईच्या वासराच्या पायावरून चार चाकीगाडी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वासराचा पाय पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. मात्र, परिसरातील गोरक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या मुक्या जीवाला वेळेवर उपचार मिळून जीवदान मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर वासरू वेदनेने तडफडत होते. ही माहिती बजरंग दलाचे अध्यक्ष नागेश लोखंडे आणि गोरक्षक पवन कार्लेकर यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वासराची अवस्था पाहता त्यांनी त्वरित एका तीन चाकी गाडीची(ऑटोची) व्यवस्था केली व जखमी वासराला त्यामध्ये सुरक्षितपणे उचलून ठेवत स्थानिक मुखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
दवाखान्यातील डॉक्टरांनी वासराच्या जखमी पायावर तातडीने प्रथमोपचार व योग्य औषधोपचार केले. वेळेवर उपचार मिळाल्याने वासराला मोठा दिलासा मिळाला. उपचार पूर्ण झाल्यानंतर, या दोन्ही कार्यकर्त्यांनी वासराला पुन्हा त्या गाई कडे नेऊन सुखरूप सोडले.
नागेश लोखंडे आणि पवन कार्लेकर यांनी दाखवलेल्या या भूतदयेचे आणि संकटाच्या वेळी केलेल्या तातडीच्या मदतीचे परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे. एका मुक्या जिवाचे प्राण वाचवून त्यांनी माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समाजा समोर ठेवले आहे.



