नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाटात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत टाटा मॅजिकचा चक्काचूर, ६ ठार तर ८ गंभीर जखमी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क भोकर: १० सप्टेंबर २६
नांदेड–भोकर महामार्गावर वाकद गावाजवळील सीताखंडी घाटात गुरुवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रक आणि प्रवासी टाटा मॅजिक व्हॅन यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत प्राथमिक माहितीनुसार ५ ते ६ प्रवाशांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही धडक इतकी भीषण होती की प्रवासी व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. व्हॅनचा पत्रा फाटून प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात आत अडकले, तर ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान होऊन चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताचा आवाज ऐकताच वाकद परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने तत्काळ बचावकार्य सुरू केले. केबिनमध्ये अडकलेल्या चालकासह व्हॅनमधील प्रवाशांना शर्थीच्या प्रयत्नांनी बाहेर काढून उपचारासाठी भोकर आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अल्तमाज शेख, शेख फिरोज, पांडुरंग वाघमारे, लक्ष्मीबाई वाघमारे (सर्व रा. भोकर) आणि बलवान पवार (रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर) यांचा मृत्यू झाला असून एका मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती; पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, सीताखंडी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भरधाव वाहनांवर नियंत्रण व आवश्यक उपाययोजनांची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत.

