नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टिमवर पूर्ण बंदी; नियमांच्या अंमलबजावणीसाठी मुखेड पोलिसांची शांतता समिती बैठक संपन्न

मुखेड (श्रमिक एकता न्यूज नेटवर्क | ०९ सप्टेंबर):
आगामी गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हाप्रशासन व पोलीस विभागाने कडक पावले उचलली आहेत. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तीव्र ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरावर सक्त बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
हा प्रतिबंधात्मक आदेश ७ सप्टेंबर २०२६ (मध्यरात्री १२:०० वा.) पासून ८ नोव्हेंबर २०२६ (मध्यरात्री१२:०० वा.) पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत डॉल्बी मालक, चालक अथवा अन्य कोणासही ही यंत्रणा वाजवण्यास किंवा चालवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
दहीहंडी, श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यताअसते. उच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन व्हावे आणि आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठीहा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर, नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि गणेशोत्सवाचे शांततेत नियोजन व्हावे यासाठीमुखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आज तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत सभागृहात विशेषशांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाली.
या बैठकीस मुखेड शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठितनागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाचे पावित्र्य राखून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि शांतता राखावी, असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

