सामाजिक

मुखेडला सध्या नव्या ‘इमारतीची’ नाही, तर ‘तज्ञ डॉक्टरांची’ गरज! आमदारांच्या निधीच्या मागणीवर नागरिकांचे संतप्त सवाल

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २० नोव्हेंबर २६

मुखेड येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि महिलांच्या स्वतंत्र १०० खाटांच्या रुग्णालयासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी स्थानिक आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुखेड शहर नांदेड पासून ८० किमी तर लातूर पासून ११० किमी लांब असल्याने तातडीची वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने गोरगरीब रुग्णांना जीवगमवावा लागतो, अशी व्यथा त्यांनी पत्रात मांडली आहे. मात्र, आमदारांच्या या मागणीने मुखेडकरांच्या मनात एका वेगळ्याच संतापाला तोंड फोडले आहे. “सध्या आम्हाला सिमेंट–काँक्रीटच्या नव्या इमारतीची नाही, तर रुग्णालयात हजर राहणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची गरज आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

नव्या इमारतीसाठी कोट्यवधींचा निधी मागितला जात असताना, सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी रुग्णालयाची झाडाझडती घेतली होती, ज्यात बंद असलेला अतिदक्षता विभाग (ICU) आणि डॉक्टरांची अनियमितता उघड झाली होती. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. रुग्णालयातील रक्तपेढी, सोनोग्राफी कक्ष, नेत्ररोग, दंतरोग विभाग आणि अगदी बाह्यरुग्ण विभागही (OPD) अनेकदा ओस पडलेले किंवा बंद अवस्थेत दिसतात.

इमारती उपचार करणार की डॉक्टर?

 केवळ इमारत मोठी असून चालत नाही, तर त्या इमारतीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरआणि पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे.

 गरोदर माता व बाळंतीण महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी केली जात आहे, पण सध्याच्या रुग्णालयात साध्या सोनोग्राफी विभागाचे कुलूपही वेळेवर उघडत नसेल, तर नव्या इमारतीचा उपयोग काय?

 लहान मुलांसाठी साधी सर्दी–तापाची औषधे उपलब्ध नाहीत आणि रुग्णांना जवळून तपासण्या ऐवजी दुरूनच तीन रंगांच्या गोळ्या दिल्या जातात.

केवळ नव्या बांधकामांचे आणि निधीचे प्रस्ताव पाठवून आरोग्य व्यवस्था सुधारणार नाही. आधीसध्याच्या उपजिल्हा रुग्णालयात पूर्णवेळ तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा, बंद असलेला आयसीयू विभागसुरू करा आणि गायब राहणाऱ्या डॉक्टरांवर वचक बसवा, अशी ठाम मागणी आता मुखेड तालुक्यातील जनतेतून जोर धरू लागली आहे. अन्यथा, नव्या इमारतीही केवळ ‘शोभेच्या वस्तू‘ बनून राहतील, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button