हसनाळमध्ये थरार! माजी सरपंचाची निर्घृण हत्या; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

▫️घराचा दरवाजा आतून बंद करून विळा आणि कुऱ्हाडीने केले सपासप वार.
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड/नांदेड :- १८ नोव्हेंबर २६
तालुक्यातील हसनाळ पदे येथे एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या मावशीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. काल रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे हसनाळसह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
लक्ष्मीबाई चंद्रर गदले (वय ५५ वर्षे, रा. हसनाळ पदे ) असे हत्या झालेल्या मयत महिलेचे नाव असून, त्या हसनाळच्या माजी सरपंच होत्या. तर मारोती भुजंग गायकांबळे (वय ४० वर्षे, रा. देगाव) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घराच्या उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी आरोपी मारोती हाहसनाळ येथे आपल्या मावशीकडे आला होता. काल रात्री घरात मारोतीची पॅरालिसिसने आजारी असलेली आई, मावशी (मयत लक्ष्मीबाई) आणि आरोपी मारोती असे तिघे जणच उपस्थित होते. रात्रीचे जेवण आटोपल्या नंतर अंदाजे ९ वाजेच्या सुमारास आरोपीने अचानक घराचा दरवाजा आतून बंद करूनघेतला. त्यानंतर त्याने विळा आणि कुऱ्हाडी सारख्या धारदार शस्त्रांनी मावशीवर सपासप वार करत तिचीनिघृण हत्या केली.
गावकऱ्यांचे प्रसंगावधान घराच्या आतून आरडा ओरडा आणि किंकाळ्या ऐकू आल्याने गावातील नागरिकांनी तात्काळ घराकडे धाव घेतली.गावकऱ्यांनी पहारीने आणि इतर साहित्याने दार तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, घराचे दार नवीन आणि मजबूत असल्याने ते तुटले नाही. अखेर गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून आरोपी पळून जाऊ नये म्हणून त्या दाराला बाहेरून कडी लावली आणि तात्काळ मुखेड पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांची तात्काळ कारवाई घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड आणि त्यांच्या पथकाने अत्यंत वेगाने घटनास्थळी धाव घेतली. बंद दरवाजा उघडून पोलिसांनी घराच्या आत असलेल्या आरोपी मारोतीला ताब्यात घेत अटक केली.घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते, त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत.
मयत लक्ष्मीबाई गदले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



