अवैध सावकारी आणि सक्तीच्या कर्जवसुली विरुद्ध नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम; नागरिकांना निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- १४ नोव्हेंबर २६
नांदेड जिल्ह्यात फोफावलेली अवैध सावकारी, शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारणी आणि बळजबरीने केली जाणारी कर्जवसुली रोखण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या जाचाला बळी पडलेल्या नागरिकांनी कोणत्याही दबावाला न घाबरता निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन नांदेडचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांच्या अध्यक्षतेखाली २४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सावकारी समितीच्या बैठकीत तक्रारींचा आढावा घेऊन ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४’ मधील तरतुदींनुसार कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या अधिसूचनेनुसार, सावकारी कर्जासाठी कमाल वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर ९% तर विनातारण कर्जावर १२% व्याजदर आहे. तसेच, शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांसाठी तारण कर्जावर १५% आणि विनातारण कर्जावर १८% व्याजदर निर्धारित करण्यात आला आहे. या मर्यादेपेक्षा अधिक व्याज, चक्रवाढ व्याज किंवा दंडव्याज आकारणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांच्या कर्जवाटप आणि वसुली पद्धतीची कसून चौकशी केली जात आहे.
सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात एकूण १८८ वैध परवानाधारक सावकार असून, त्यापैकी ११४ सावकार केवळ नांदेड तालुक्यात आहेत. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६२ सावकारांच्या दप्तरांची तपासणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर अवघ्या दहा दिवसांत अवैध सावकारीसंदर्भात २३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १५ तक्रारींची पडताळणी पूर्ण झाली आहे व उर्वरित प्रकरणांवर कारवाई सुरू आहे. कोणत्याही सावकाराकडून जबरदस्तीने कर्जवसुली किंवा जास्तीचे व्याज आकारले जात असल्यास, नागरिकांनी थेट जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, नांदेड) किंवा संबंधित तालुक्याच्या उपनिबंधक/सहाय्यक निबंधक कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




