मुखेडच्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेचा २४ नोव्हेंबरपासून प्रारंभ; ३० नोव्हेंबरला पहाटे मुख्य अग्निकुंड व पालखी सोहळा

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : २१ नोव्हेंबर २६
मुखेड शहराचे ग्रामदैवत तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री वीरभद्रे स्वामी मंदिराची वार्षिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. यात्रेनिमित्त विविध पारंपरिक धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सध्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या यात्रेचा विधिवत प्रारंभ मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘हळद लेपन‘ या पारंपरिक धार्मिक विधीने होणार असून, त्यानंतर रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरणी वाटप (गूळ वाटप) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रेतील सर्वात मुख्य व धार्मिक आकर्षण असलेला अग्निकुंड व पालखी सोहळा सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजता संपन्न होणार आहे. मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी वीरभद्र शंकरअप्पा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण धार्मिक विधी पार पडणार असून, यानिमित्ताने भाविकांना श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक परंपरेचा संगम अनुभवायला मिळणार आहे. तरी श्रीवीरभद्रेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुजारी वीरभद्र शंकरअप्पा स्वामी यांनी केले आहे.



