बनावट यादी परस्पर बनवून उर्वरीत अतिवृष्टीग्रस्तांना वंचित ठेवले; तलाठ्यावर कारवाईची मागणी
मुखेड : प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील संसार उपयोगी साहित्य, घराचे व अन्नधान्याचे अतोनात नुकसान झाले होते तेव्हां पुराचे पाणी घरात शिरल्याची चौकशी व पंचनामे संबधीत तलाठी गावांतील नागरिकांना सूचना न देता परस्पर बोगस यादी बनवली. या यादिमध्ये ज्या नागरिकांच्या घरात पाणीच शिरले नाही अशांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. आणी ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरुन नुकसान झाले अशा नागरिकांचे यादीत नावे नाहीत.
तलाठी यांच्या मनमानीमुळे ख-या नागरिकांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे, तलाठी यांनी २६ लोकांची बनावट यादी परस्पर बनवून उर्वरीत लोकांना वंचित ठेवले असल्यामुळे संबधीत तलाठी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी चोंडी येथील नागरिकांनी देगलूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील चोंडी येथे मोठ्या प्रमाणात ढगफुटीदृश्य पावुस झाल्याने नदी, ओढे, नाल्यांना मोठा पुर आला होता तलाव तुडुंब भरले होते या अतिवृष्टीमुळे शेती, पिकांचे, घरांचे प्रचंड नुकसान झाले होते यामध्ये चोंडी गावच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरुन घरातील साहित्यांचे नुकसान व अन्नधान्यांची नासाडी झाली होती त्यामुळे शासनाकडुन नुकसानीची पहाणी व चौकशी करुन पंचनामे करण्यात आले परंतु चोंडी येथील तलाठ्यांनी ख-या लाभार्थ्यांना वंचित ठेवून परस्पर २६ जणांची बोगस यादी बनवून बाकीच्या लोकांवर अन्याय केला आहे त्यामुळे त्या वंचित लोकांना न्याय देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते यासिन पठाण, सचिन देवकते, शेख मुजाहिद, तयब पठाण, बाळासाहेब पाटील, बालाजी किसवे, बालाजी डोरनाळे, महेबूबबेग साब, राम नागमोडी, इस्माईल पठाण, माधव चिटकलवार, वामन चिटकलवार, महेबूब शेख, अंकु श कोटचिरे, सिद्धेश्वर चितकलवार, माणिक बोडके, प्रकाश नागमोडी विक्रम पाटिल, शिवाजी चिटकलवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



