नांदेडात काळ्या पाण्याची शिक्षा, गोव्यात नगरसेवकांची ‘मौज’; लोकशाहीची लाज वेशीवर टांगली!

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ जून २६
“जनतेने मत दिलंय ना? मग आता मरा घाणीच्या पाण्यात!” बहुदा नांदेडच्या नगरसेवकांचा जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच असावा, असे चित्र सध्या नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या गणितात गुंग झालेले आणि स्वतःला ‘जनतेचे सेवक‘ म्हणवून घेणारे नगरसेवक सध्या गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर निळ्या पाण्याच्या लाटांवर स्वार झाले आहेत; तर दुसरीकडे त्यांनीच वाऱ्यावर सोडलेली नांदेडची जनता नळातून येणाऱ्या गटारीच्या काळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याशी जीवघेणा संघर्ष करत आहे.
नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणी नाही, तर थेट गटारीचा चिखल येत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण याच दूषित पाण्यामुळे आजाराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अनेक कुटुंबांना विकतचे पाणी घेण्याची किंवा आरोग्याशी तडजोड करण्याची वेळ आली आहे. महापालिका आणि पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेत आहे आणि लोकप्रतिनिधींना या नरकयातनेची साधी लाजही उरलेली नाही, असा तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरात पाण्याचा हाहाकार माजलेला असताना, विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नगरसेवकांना ‘फाइव्ह स्टार‘ सहलीवर (टूर) रवाना करण्यात आले आहे. गोवा आणि कोकणातील आलिशान हॉटेल्समध्ये हे लोकप्रतिनिधी जनतेच्या पैशांवर मौजमजाकरत असल्याची जोरदार चर्चा आहे.

या संतापजनक परिस्थितीवर नांदेडकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट हल्ला चढवला आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर “प्रभागात नगरसेवक दाखवा आणि हजार रुपये मिळवा” अशा आशयाच्या पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहेत. मत मागताना पाया पडणारे हे लोकप्रतिनिधी ऐन संकटाच्या काळात शहरातून गायब झाल्याने जनतेचा संताप अनावर झाला आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि त्यांच्या मूलभूत गरजांपेक्षा या नेत्यांना स्वतःचे राजकीय हित आणि निवडणुकीचे ‘मॅनेजमेंट‘ अधिक महत्त्वाचे वाटत आहे. संकटसमयी प्रशासनाची मान पकडून जनतेलान्याय मिळवून देण्याऐवजी हे नगरसेवक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
आम्ही तुम्हाला मतं केवळ गोव्यात जाऊन निळेशार समुद्र पाहण्यासाठी आणि पार्ट्या झोडण्यासाठी दिली होती का? जनतेला काळ्या घाणीच्या पाण्यात सडवून स्वतः निळ्या पाण्यात पोहणाऱ्या या लोकप्रतिनिधींना आगामी काळात वेशीवर टांगल्याशिवाय जनता राहणार नाही, असा इशारा आता संतापलेल्या मुखेड आणि नांदेडच्या नागरिकांमधून दिला जात आहे.



