हृदयद्रावक! बियाण्यांसाठी ठेवलेले कीटकनाशक ठरले काळ; विषारी प्रभावाने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क धर्माबाद :- ०६ ऑगस्ट २६
हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून घरात साठवून ठेवलेल्या कीटकनाशकाच्या विषारी प्रभावामुळे दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे घडली आहे. गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरोही मल्लेश डेबेकर (वय ६) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय ४) अशी या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या चिमुकल्या बहिणींची नावे आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बाळापूर येथील रहिवासी मल्लेश डेबेकर यांच्या घरात हरभरा बियाणे साठवून ठेवण्यात आले होते. बियाण्यांना कीड लागू नये म्हणून पोत्यांमध्ये काही कीटकनाशके ठेवण्यात आली होती. ५ ऑगस्टच्या रात्री डेबेकर दांपत्य आपल्या आरोही आणि आराध्या या दोन्ही मुलींसोबत नेहमीप्रमाणे त्याच खोलीत झोपले होते.
रात्रीच्या वेळी बंद खोलीत या कीटकनाशकाचा विषारी गॅस (प्रभाव) पसरला. या विषारी वासाने कुटुंबातील सर्वांनाच अचानक उलट्यांचा आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. मात्र, लहान मुलींची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. उपचाराची संधी मिळण्यापूर्वीच, दि. ६ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास आरोही आणि आराध्या या दोन्ही बहिणींची प्राणज्योत मालवली.
मल्लेश डेबेकर यांना आरोही आणि आराध्या या दोनच मुली होत्या. आपल्या डोळ्यांसमोर पोटच्या दोन्ही गोळ्यांचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने डेबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलींच्या जाण्याने आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एका साध्या चुकीमुळे हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने बाळापूर गावासह संपूर्ण तालुक्यातून या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.



