नांदेड भरदिवसा पेट्रोल पंपावर थरार: गँगवारमधून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

▫️धनेगाव परिसरात खळबळ; दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आला असताना अज्ञातांचा हल्ला
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- ०८ ऑगस्ट २६
धनेगाव परिसरातील एका पेट्रोल पंपावर भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदर सिंग बावरी (वय ३२) असे या मृत तरुणाचे नाव असून, ही हत्यागँगवार मधून (टोळीयुद्ध) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि भरदिवसा हा थरार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदर सिंग बावरी हा आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर आला होता. तो पंपावर असतानाच अचानक तिथे आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, यात गंभीर जखमी झालेल्या इंदर सिंग बावरी याचा जागीच मृत्यू झाला.
मृत इंदर सिंग बावरी हा मूळचा कौठा परिसरातील रहिवासी होता. या हत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि गँगवार मधूनच झालीअसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या दोन अज्ञात मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.



