वारकरी संप्रदायाच्या संतामध्ये विद्रोह करण्याचे धाडस बसव विचारात दिसून येते:-प्रा.डॉ. रवींद्र बेंबरे

मुखेड :-
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाच्या वतीने क्रांतीसूर्य , थोर विचारवंत , संत महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . महात्मा बसवेश्वर हे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक सुखाचा क्षण शरणांसाठी खर्ची घातले . संपूर्ण देशातील विविध भागाचे व्यक्ति कर्नाटकात येऊन बसव कल्याण मध्ये आपले जीवन जगत होते . सर्व प्राणी मात्रांना शांतीचा संदेश देणारे एकमेवाद्वितीय बसवेश्वर आहेत . बसवेश्वरांच्या विचारांचे संस्कार त्यांच्या अनमोल वचनातून दिसून येतात . सकल विश्वाला समतेचा संदेश देऊन बसवेश्वर समता प्रस्थापित केले. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी संत मंडळी , महापुरुषांवर आहे असे प्रतिपादीत केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरभद्र शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती , प्रमुख मार्गदर्शक देगलूरच्या वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.डॉ. रवींद्र बेंबरे , प्रमुख पाहुणे म्हणून से.नि.जेष्ठ प्रा.सी.बी.साखरे , प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते हे उपस्थित होते . प्रास्ताविक प्रा.डॉ. संतोष शेंबाळे , सूत्रसंचालन प्रा.डॉ. विजय वारकड तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. प्रसाद जोशी , पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. शिवसर्जन टाले यांनी करून दिले . मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रम सुरू झाला .
डॉ. बेंबरे यांनी आपल्या भाषणात ” महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्र : एक अनुबंध “हा विषय घेऊन जगतज्योती बसवण्णा यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकताना बसवेश्वर यांनी तळागाळातील अठरापगड जाती , धर्म , पंथाच्या व्यक्तिला स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले . बाराव्या शतकात ऐतिहासिक कामगिरी करणारे बसवण्णा हे होते . स्त्री ही घराच्या एका चौकटीत जीवन जगत होती त्या स्त्रीला सन्मान मिळवून देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले . बसवेश्वरांनी दासोह ही प्रथा निर्माण केली . समाजातील दुःख , वेदना समजून घेऊन कल्याण क्रांती घडवून आणली . शरणांची ही क्रांती अहिंसात्मक होती . अनुभव मंटप निर्माण करण्यासाठी जो खर्च करण्यात आला तो खर्च आजच्या महाराष्ट्रातील संपत्तीतून झाला आहे . बिज्जल राजाचा सविस्तर इतिहास सांगितला . बसव युगाच्या स्त्री लेखनात ३५ महिलांचा उल्लेख सापडतो . ७० महिला व ७०० पुरुष अनुभव मंडपाचे सदस्य होते . अल्लमप्रभू यांना अनुभव मंडपाचे अध्यक्षपद देण्यात आले होते . वारकरी संप्रदायाच्या संतामध्ये विद्रोह करण्याचे धाडस बसव विचारात दिसून येते असे मार्गदर्शन केले .
प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत संत ,विचारवंत , महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव जास्त आहे . त्याच विचारवंतापैकी एक म्हणजे महात्मा बसवेश्वर आहेत . त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व वारसा आपण जपले पाहिजेत . कर्मातून केलेली पुजा ही देवाची पुजा आहे . श्रमाची प्रतिष्ठा बसवेश्वरांनी करून दिले . मेहनतीचा सुगंध जीवनाला आनंद देत असतो . स्त्री चळवळ बसवेश्वरांनी उभी केली ती अविस्मरणीय आहे असे विचार मांडले .
अध्यक्षीय भाषणातून ओंकारअप्पा मठपती यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारातून शांतीचा संदेश मिळतो . महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विविध उपक्रम राबवत असतो . बसवेश्वरांच्या विचारांचा संस्कार अंगीकार करून सुसंस्कृत बनावे . संत साहित्य माणसाला सन्मान मिळवून देते . वारकरी संप्रदायाच्या विचारावर बसवेश्वरांचा प्रभाव दिसून येतो . मुखेडच्या समग्र लिंगायत समाजाची भावना मनात ठेवून संस्थेनी बसवेश्वरांच्या भव्य पुतळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली . स्वातंत्र्य , समता , बंधुता आणि न्याय निर्माण करण्यासाठी बसवेश्वरांच्या वचनांचा अभ्यास करावा असे विचार व्यक्त केले . यावेळी प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती .



