जातनिहाय जनगणना हा काँग्रेससह ओबीसींचा विजय – डॉ. श्रावण रॅपनवाड

मुखेड-( ता. प्रतिनिधी)
मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुलजी गांधीसह काँग्रेस आणि ओबीसींच्या दबावाचे फलित असून या घोषणेची अंमलबजावणी लवकर व्हावी अशी आशा काँग्रेस सचिव तथा ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपणवाड यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते तथा काँग्रेस प्रदेश सचिव श्रावण रॅपणवाड यांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की अनेक वर्षापासून विरोधी पक्षनेते खा राहुल गांधी यांनी हा विषय सतत लावून धरला असून त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने अनेक आंदोलनेही जातनिहाय जनगणनेसाठी केली आहेत. लोकसभा राज्यसभेत भाजपचा विरोध असतानाही काँग्रेसकडून खा राहुलजींसह अनेक नेत्यांनी हा विषय लावून धरला होता. त्याचबरोबर देशभरातील ओबीसी कार्यकर्त्यांकडूनही जातनिहाय जनगणनेची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. सुरुवातीला मोदी सरकार आणि भाजपाची जात निहाय जनगणनेला विरोध होता. पण विरोधी पक्ष आणि ओबीसींच्या जनरेट्याला प्रतिसाद देत मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का होईना जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. परंतु ही घोषणा केवळ बिहार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी नसावी तर प्रत्यक्ष जातनिहाय जनगणना होऊन सर्व जातींचे शासन प्रशासनातील प्रतिनिधित्व लवकर कळावे अन्यथा ही एक केवळ घोषणा राहून जनतेच्या डोळ्यात धूळफेक होईल अशी भीतीही रॅपनवाड यांनी व्यक्त केली आहे.
जातनिहाय जनगणनेच्या घोषणेची अंमलबजावणी लवकर न झाल्यास काँग्रेस आणि ओबीसी जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही ओबीसी नेते डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी दिला आहे.



