नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पूरस्थिती शेतीचे मोठे नुकसान

नांदेड प्रतिनिधी:- १७ ऑगस्ट २५
नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नद्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालीआहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा हाहाकार सुरू असून हजारो हेक्टर शेती पुराखाली गेलीआहे. सर्वाधिक फटका किनवट, हिमायतनगर आणि माहूर तालुक्याला बसला आहे. नदी–नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून फुलवळ मंडळात तब्बल १३३.२५ मि.मी. पाऊस पडला आहे.
किनवट व माहूर परिसरातील पैनगंगा नदीला पूर आला असून शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उमरी तालुक्यातील मोखंडी नाल्यासह अनेक गावांत पाणी घुसले असून घरे, मंदिरे आणि ग्रामपंचायतीच्या इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
विष्णुपुरी प्रकल्प ९५ टक्के भरल्याने प्रशासनाने दरवाजे उघडून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूकेला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचीपथके तैनात आहेत. प्रशासन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे.



