फुलवळ नदीच्या पुलावर दुचाकीचा भीषण अपघात; नगारवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क फुलवळ/कंधार: ३० जुलै २६
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील नदीच्या पुलावर आज एक अत्यंत भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सचिन रावसाहेब एटवाड असे या मयत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन एटवाड हे त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून (वाहन क्रमांक: MH 14 EV 1913) प्रवास करत होते. फुलवळ नदीच्या पुलावरून जात असताना हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की, यात गंभीर मार लागल्याने सचिन यांचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला.
या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि दुसऱ्या एखाद्या वाहनाने धडक दिली आहे का, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास संबंधित पोलीस अधिकारी करत आहेत.
ऐन तारुण्यात सचिन एटवाड यांच्यावर काळाने झडप घातल्याने नगारवाडीसह संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.



