औरंगाबाद पदवीधर निवडणूक: मुखेड तालुक्यात ५७.२५% मतदानाची नोंद

३,१२३ मतदारांपैकी १,७८८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; दहा केंद्रांवर शांततेत मतदान
श्रमिक एकता न्यूज मुखेड:- २३ ऑक्टोंबर २६
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मुखेड तालुक्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील एकूण ३ हजार १२३ मतदारांपैकी १ हजार ७८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात एकूण ५७.२५ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये १ हजार ५४७ पुरुष, २४० महिला आणि एका इतर मतदाराचा समावेश आहे.
मुखेड तहसील कार्यालयाच्या लोकसभा-विधानसभा निवडणूक शाखेच्या वतीने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. तहसीलदार अभयराज नंजुंडे यांनी मतदानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी नांदेड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ यांच्याकडे सादर केला.
तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार बार्हाळी येथे ४४० मतदारांपैकी २६५ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ६०.२३ टक्के मतदान झाले. मुखेड शहरातील मतदान केंद्र क्रमांक ५२९ येथे ४४२ मतदारांपैकी २९४ मतदारांनी मतदान केले असून, येथे ६६.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान केंद्र क्रमांक ५३० येथे ३११ मतदारांपैकी १७९ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ५७.५६ टक्के मतदान झाले.
मुखेड ग्रामीण केंद्रावर २९३ मतदारांपैकी १८५ मतदारांनी मतदान केले असून, येथे ६३.१४ टक्के मतदान झाले. जांब बु. येथे ५८.२१ टक्के, येवती येथे ५२.५६ टक्के, जाहूर येथे ४८.६२ टक्के, चांडोळा येथे ५२.२१ टक्के आणि मुक्रमाबाद येथे ५७.८८ टक्के मतदान झाले.
आंबुलगा बु. येथील मतदान केंद्रावर १७७ मतदारांपैकी ८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर ४५.२० टक्के मतदान झाले. तालुक्यातील सर्व दहा मतदान केंद्रांवर सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. तहसीलदार अभयराज नंजुंडे, निवडणूक नायब तहसीलदार सतीश जोहरे, महसूल सहायक संदीप भुरे, लिपिक सुनील कुलकर्णी, ग्रामस्थ अधिकारी औदुंबर वाडीकर, ऑपरेटर बबलू अत्तार, शेख फरदीन, गणेश बंडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
क्षेत्रीय अधिकारी म्हणून मुखेडचे गटशिक्षणाधिकारी योगेश नखाते, पाणीपुरवठा अधिकारी भोजराज. एन, लेंडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी पी. एस. घोडके आणि तालुका कृषी अधिकारी एस. जी. बोधमवाड यांनी जबाबदारी पार पाडली.
प्रशासनाच्या समन्वयातून तालुक्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.



