सामाजिक

रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या ‘देवमाणूस’ डॉ. दिलीप पुंडे यांचा रुग्णाच्या नातेवाईकांकडून वाढदिवस साजरा!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार /कौठा :११ नोव्हेंबर २६

मुखेडचे सुपुत्र आणि सर्वसामान्यांसाठी ‘देवमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. दिलीप पुंडे यांचा वाढदिवस नुकताच एका अनोख्या आणि अत्यंत भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. बसवकौठा येथील एका रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन पुंडे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कृतज्ञतापूर्ण सोहळ्यामागे एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे. मागील वर्षी बसवकौठा येथील अनुसयाबाई बाबुराव गणगोपलवाड यांना गंभीर सर्पदंश झाला होता. उपचारासाठी आणले असता त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, विषामुळे त्यांचे हृदयही बंद पडले होते. सर्व आशा मावळल्या असताना डॉ. दिलीप पुंडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि अनुसयाबाईंना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत त्यांना दुसरे जीवदान दिले.याच उपकाराची आणि निस्वार्थी सेवेची जाणीव ठेवून गणगोपलवाड कुटुंबीय आणि बसवकौठा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत डॉक्टरांचा वाढदिवस साजरा केला.

या विशेष प्रसंगी कौठा येथील डॉ. स्वप्नजा चांडोळकर, प्रफुल येरावार, विलास करडे, मारोती हराळे, सतीश देशमुख, साईनाथ देशमुख, विजू पाटील, माधव बरगले, हणमंत पालिमकर, गजानन पालिमकर, शिवलिंग देशमुख, भीमाशंकर पालिमकर, व्यंकट गणगोपलवाड, पिंटू गणगोपलवाड आणि रवी इंदोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित सर्व ग्रामस्थांनी डॉ. पुंडे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. एका डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमधील हा जिव्हाळा पाहून सर्वत्र डॉ. पुंडे यांच्या कार्याचे आणि गावकऱ्यांच्या कृतज्ञतेचे मोठे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button