Uncategorized
मुलींनी सजग व सुदृढ राहणे आजची गरज-डॉ.सौ.रचिता कौरवार.

मुखेड / प्रतिनिधी.
मुलींनी आपल्या मनात कोणत्याही गोष्टी न ठेवता त्या आपल्या आई,वडील व भावाकडे व्यक्त केल्या पाहिजेत,सेफ सर्कल ओळखता आले पाहिजे, वयाबरोबर शरीरामध्ये व मनामध्ये जे बदल होतात त्याने घाबरून न जाता संयमाने त्याकडे पाहिले पाहिजे, मोबाईलचा उपवास करायला शिका दररोज काही काळ मोबाईल पासून दूर रहा,सोळावे वर्षे महत्त्वाचे आहे.या काळात आपण वाहून न जाता सदसद्विवेक बुद्धीने काम केले पाहिजे,समाजातला रावण ओळखता आला पाहिजे, महाविद्यालयाने मुलीच्या स्वसंरक्षणाचे वर्ग घेतले पाहिजेत, केवळ मुलींनाच बंधन नको तर मुलांनीही काही गोष्टी पाळल्या पाहिजेत,तुम्ही तुमच्या छंदात,ध्येयात मन गुंतवा, स्वतःचा छंद जोपासा, जसे विचार तसे आचार असतात, घरातून बाहेर जाण्यापुर्वी हातावर दही दिले जात असे त्याचे कारण मन शांत राहावे, डोके शांत रहावे हाच होता याचाच परिणाम शरीराच्या कृतीवर होतो,बलात्कार करणे हे मानसिक व्यंग्य आहे, एकटीने बाहेर जाऊ नका, विद्यार्थिनींनी चांगली संगती करावी,मुलींनी सजग व सुदृढ राहणे ही आजची गरज आहे असे प्रतिपादन डॉक्टर सौ.रचिता अशोक कौरवार यांनी ग्रामीण कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथे 'महिला सुरक्षितता व कायदा' या विषयावर' महिला सक्षमीकरण लैंगिक अत्याचार निर्मूलन अँटी रॅगिंग समिती' आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना व्यक्त केले.अतिशय सुंदर सुबक अशी मांडणी करत किशोर वयीन मुलींनी कॉलेज मध्ये वावरताना कोणती काळजी घ्यावी हे मुलींना आपल्या वक्तव्यातून समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.हरिदास राठोड म्हणाले की,मुलींनी महाविद्यालयीन जीवनात सजग सतर्क राहिले पाहिजे,एक मुलगी दोन घराला सूसंस्कृत बनवत असते तेंव्हा मुलीवर शिक्षणा सोबतच चांगले संस्कार घडले पाहिजेत सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण,लैंगिक अत्याचार निर्मूलन व अँटी रॅगिंग समितीच्या प्रमुख प्रा.डॉ.शिल्पा शेंडगे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.सौ. अरुणा इटकापल्ले यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.निवृत्ती नाईक यांनी केले.कार्यक्रमाला या समितीतील सदस्य,महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



