लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी शाळास्तरावर उपक्रम राबवणे गरजेचे… व्यंकट गंदपवाड

नांदेड प्रतिनिधी:- २४ जुलै २५
भारतीय लोकशाही ही जगाला दिशा देणारी लोकव्यवस्था प्रणाली आहे. ती सामाजिक समता, बंधुता, एकात्मता जोपासणारी व सामान्य घटकाला न्याय देणारी व्यवस्था आहे.
अशी लोकशाहीची मूल्ये रुजवण्याचे कार्य शाळास्तरावर होणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी व्यक्त केले.
शहरातील गुरुनानक विद्यामंदिर शिवनगर येथे शालेय मंत्रिमंडळ व वर्ग प्रमुख निवडणूक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

ही निवड लोकशाही पध्दतीने करण्यात आली. यात शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत मतदान प्रक्रिया समजून घेऊन मतदान केले. यात मतदान केंद्र, मतदान अधिकारी, प्रचार व प्रसार पत्रके, स्वयं छायाचित्र बिंदू तयार करण्यात आले होते.
एका मताचे मूल्य काय असते. मतदानाचा हक्क बजावणे आपली जबाबदारी आहे. अशा शाळास्तरावरील उपक्रमातून नेतृत्व, संघटन, संयम, निर्णय क्षमता या गुणांचा विकास होतो. यामुळे बालवयापासून संस्कारक्षम नागरिक तयार होण्यास मदत होते. यासाठी शाळास्तरावर असे उपक्रम राबणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक सुशीलकुमार चव्हाण, समिती सदस्य मणिकंठ चव्हाण, सहशिक्षक दिगंबर मेंडके, सरिता भोसले, मयुरी सुदनवार, शारदा आबादार, बालाजी जाधव, संदीप गायकवाड, राजेश बेले, नारायण कांबळे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



