मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला गती; प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे ‘४ दिवसीय’ वेळापत्रक जाहीर

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६
राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने निर्मित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार, मुखेडचे तहसीलदार धनंजय राऊत यांनी तालुक्यातील एकूण १०९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
या निवडणूक आणि आरक्षण कार्यक्रमात मुखेड तालुक्यातील मुदत संपत आलेल्या १०८ ग्रामपंचायती आणि ‘येवती‘ ग्रामपंचायतीमधून नव्याने स्थापित झालेली ‘रत्नातांडा’ अशी एकूण १०९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाच्या परिपत्रका प्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन केले जाणार आहे.
आरक्षण सोडत व विशेष ग्रामसभांचे दिनांक निहाय सुधारित वेळापत्रक:
१) दिनांक: ०९ जून २०२६ रोजी खालील गावांमध्ये सोडत होईल:
आखरगा, आंबुलगा बु., आंदेगाव, आडलुर / नंदगाव, बेरळी बु., बेरळी खुर्द, बिल्लाळी, बावलगाव, बावनवाडी, बेन्नाळ, बेटमोगरा, भगनुरवाडी, भाटापुर प.दे., भासवाडी/बिहारीपुर, भिंगोली, बोमनाळी, बामणी, बापशेटवाडी, चव्हाणवाडी, चांडोळा, चोंडी, चिवळी, दापका गु., दापकाराजा, देगांव, धामणगाव, धनज/जामखेड, डोंगरगाव.
२) दिनांक: १० जून २०२६ रोजी खालील गावांमध्ये सोडत होईल:
डोरनाळी, एकलारा, गोजेगाव, गोणेगाव, हाळणी/नागराळ, हंगरगा खुर्द, हंगरगा प.क., हसनाळ प.दे., हसनाळ प.मु., हातराळ, हिब्बट, हिप्परगा दे, हिरानगर, होकर्णा, होंडाळा, होनवडज, इटग्याळ प.दे., इटग्याळ प.मु., जाहुर, जांब खु, जांभळी, जिरगा, कबनुर, कलबंर, कामजळगा, कमळेवाडी, केरुर, खैरका, खरब खंडगाव.
३) दिनांक: ११ जून २०२६ रोजी खालील गावांमध्ये सोडत होईल:
खतगाव प.दे., खतगाव प.मु., कोळनुर, कोटग्याळ/वसंतनगर, कोटग्याळवाडी, कुंद्राळा, लादगा, लखमापुर, माकणी, मंडलापुर, मंग्याळ, मांजरी, मारजवाडी, मावली, मेथी खपराळ, मोटरगा, मुक्रामाबाद, नंदगांव प.कं., पाळा, पांडुर्णी, परतपुर, राजुरा बु, राजुरा तांडा, रावणगाव, रावी, रत्ना तांडा, सकनुर, सलगरा बु., सलगरा खु.
४) दिनांक: १२ जून २०२६ रोजी खालील गावांमध्ये सोडत होईल:
सांगवी बेनक, सांगवी भादेव, सावळी, सावरगाव पि., सावरगाव वाडी, सावरमाळ, शिकारा, शिरुर दबडे, तग्याळ, तांदळी, तारदडवाडी, तुपदाळ खु., उच्चा बु, उमरदरी, उंद्री प.मु., उंद्री प.दे., वंडगीर, वडगाव, वळंकी, वर्ताळा/शेळकेवाडी, वसुर, येवती.
या प्रक्रियेची अचूक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांची०५/०६/२०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता तहसिल कार्यालय मुखेड येथील सभागृहात प्रशिक्षण बैठकआयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रभाग रचना, जागांचे आरक्षण निश्चित करणे आणि चक्रानुक्रमेआरक्षण देणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या २०११ च्या अध्यादेशानुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १०(२) मधील सुधारणेनुसार, ग्रामपंचायतींच्या एकूण जागांच्या $1/2$ (५० टक्के) जागा या स्त्रियांसाठी(अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिला जागा धरून) राखीव ठेवल्या जाणार आहेत.
तहसीलदारांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, प्रभाग रचना आणि आरक्षण हा संपूर्ण निवडणुकीचा पायाअसल्याने या कामात कोणतीही त्रुटी राहता कामा नये. प्रभाग रचना व आरक्षणाची विहीत मुदतीत अंमलबजावणी न झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची व विभागीय चौकशीची कारवाई केली जाईल.
आरक्षण सोडत काढण्याकरिता घेण्यात येणाऱ्या या विशेष ग्रामसभेची माहिती गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ३ दिवस अगोदर दवंडी, जाहीर प्रगटन आणि व्हॉट्सॲप ग्रुप इत्यादी माध्यमां द्वारेगावकऱ्यांना पूर्वसूचना देणे संबंधित गावाच्या ग्राम विकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारीयांना बंधनकारक करण्यात आले आहे.
या जाहीर झालेल्या सविस्तर वेळापत्रकामुळे आता मुखेड तालुक्यात ९ ते १२ जून या कालावधीत गावागावांत राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार असून सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे



