पत्रकार घडवणारी माणूसरुपी फॅक्टरी: निर्भीड पत्रकारितेचा महामेरू ‘निखिल वागळे’

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ एप्रिल २६
पत्रकारिता क्षेत्रातील एक असे नाव, ज्यांच्या आवाजाने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणतात आणि ज्यांच्या लेखणीने अन्यायाला वाचा फुटते, ते म्हणजे निखिल वागळे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू प्रवासाचा आढावा घेणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, एका जिवंत ‘पत्रकारिता विद्यापीठाचा‘ सन्मान करण्यासारखे आहे.
निखिल वागळे यांना ‘पत्रकारितेतील बेधडक तोफ‘ म्हटले जाते, ते उगीच नाही. सडेतोड प्रश्न विचारणे आणि समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी सत्याची साथ न सोडणे, हा त्यांचा स्वभाव आहे. ‘महानगर‘पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही तितक्याच प्रखरतेने सुरू आहे. लोकशाहीचा चौथास्तंभ भक्कम ठेवण्यासाठी त्यांनी दिलेली झुंज ही नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे.
निखिल सरांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर शेकडोतरुण पत्रकारांना घडवले. आज मराठी आणि हिंदी पत्रकारितेत आघाडीवर असलेले अनेक संपादक आणि पत्रकार हे वागळे सरांच्या तालमीत तयार झाले आहेत. म्हणूनच त्यांना ‘पत्रकार घडवणारी माणूसरुपी फॅक्टरी‘ म्हटले जाते. त्यांनी केवळ तंत्र शिकवले नाही, तर पत्रकाराने समाजात वावरतानाकिती संवेदनशील आणि निडर असावे, याचे बाळकडू दिले.
राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांभिकपणावर त्यांनी नेहमीच प्रहार केले. त्यांच्या चर्चासत्रांमधून सामान्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळाले. मग तो ‘ग्रेट भेट‘ सारखा कार्यक्रम असो किंवासोशल मीडियावरील त्यांचे विश्लेषण, त्यांनी नेहमीच सामान्यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले.
आजच्या माहितीच्या महापुरात जेव्हा ‘सत्य‘ शोधणे कठीण झाले आहे, तेव्हा निखिल वागळे यांच्यासारख्या अनुभवी आणि तडफदार नेतृत्वाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. तडजोड न करणारीपत्रकारिता कशी असते, याचे ते चालतेबोलते उदाहरण आहेत.
निखिल सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुमची ही बेधडक लेखणी आणि बुलंद आवाज असाच गर्जत राहो, हीच सदिच्छा!…
संपादक भाई आसद बल्खी



