संसाराचा मांडव विखुरला! निर्दयी पतीने साडीच्या पदराने पत्नीचा गळा आवळून घेतला जीव; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६)
मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथे एका निर्दयी पतीने किरकोळ घरगुती वादातून आपल्या पत्नीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पती–पत्नीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्वाती मारुती खांडेकर (वय ३० वर्ष) ही तिचा पती मारुती बाबुराव खांडेकर याच्यासोबत बेडरूममध्ये असताना दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मारुतीने स्वातीच्या अंगावरील साडीचा पदर तिच्या गळ्या भोवती आवळला. हा आवळ इतकाजबरदस्त होता की, स्वातीचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. ही घटना ६ एप्रिलच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आणि मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी मयत स्वातीचा भाऊ योगेश गणपत देवकते (वय २७, रा. एकलारा, ता. मुखेड) यांनी मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी मारुती बाबुराव खांडेकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक केंद्रे, आणि सहायक पोलीस निरीक्षक जावेद शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्ये मागील नेमके कारण काय होते, याचा अधिक शोध घेतला जात आहे.
मयत विवाहितेचे एक भाऊ,वडील आणि तीन मुले या परिस्थितीमुळे दुःखात आणि पश्चातापाच्या छायेत आहेत



