नांदेडमध्ये शोककळा: नाल्याच्या साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

▫️दोन सख्ख्या भावांचा समावेश
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना, हारूनबाग भागातील एका मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या चार चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण इस्लामपुरा आणि देगलूर नाका परिसरात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेली चारही मुले ही शहरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी होती. शाळा सुटल्यानंतर ही मुले नेहमीप्रमाणे घराकडे जात होती. वाटेत हारूनबाग परिसरात एका मोठ्याखड्ड्यात पावसाचे किंवा नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हीमुले पोहण्याच्या मोहापायी पाण्यात उतरली. मात्र, खड्ड्यातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ एक अशी चारही मुले पाण्यात बुडाली.
या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
महोमद अली (वय १३ वर्षे),महोमद फुरखान (वय १२ वर्षे),महोमद अदनान (वय ८ वर्षे),महोमद रेहान(वय ११ वर्षे)
विशेष म्हणजे, मृत मुलांपैकी महोमद फुरखान आणि महोमद अदनान हे दोन्ही सख्खे भाऊ होते. एकाचकुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुले घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली असता, ही मुले खड्ड्यातील पाण्यात असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याघटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. उघड्यावरील खड्डे आणि साचलेले पाणी निष्पापजीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
एकाच वेळी चार मुलांचा असा अंत झाल्याने नांदेड शहरावर शोककळा पसरली आहे.



