क्राईम

मुखेड महसूल विभागातील ‘नशाबहाद्दर’ टीमचा हैदोस! मद्यधुंद अवस्थेत वाहनधारकांकडून अवैध वसुली


श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड २७ जून २६

मुखेड तालुक्यात महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंडळ अधिकारी पी. व्ही. हाके, ग्राम महसूल अधिकारी पी. एस. शिंदे, ग्राम महसूल अधिकारी एस. एम. मैड तसेच तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी तथा प्रभारी अव्वल कारकून सत्यम हाके यांच्या गटाबाबत विविध आरोप होत असून, या पथकाला नागरिकांकडून ‘नशाबहाद्दर टीम’ अशी उपमा दिली जात असल्याची चर्चा आहे.
आरोपानुसार, संबंधित अधिकारी व कर्मचारी हे तहसीलदारांचे अधिकृत आदेश किंवा नियुक्ती नसताना स्वतःच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन वाळू, मुरूम व दगड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नावाखाली कारवाया करतात. मात्र अधिकृत गुन्हा दाखल किंवा जप्तीची प्रक्रिया न करता आर्थिक तडजोड करून वाहने सोडली जात असल्याचा आरोप आहे. तसेच मुख्यालयी न राहणे, नियमबाह्य फेरफार करणे, वरिष्ठांची परवानगी न घेता गायरान वर्ग-२ जमिनीचे फेरफार मंजूर करणे आणि मुखेड येथेच कार्यालयीन कामकाज करून नागरिकांची गैरसोय केल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत.
यातील कार्यालयीन कर्मचारी सत्यम हाके हे कार्यालयीन कामकाजाऐवजी वाहनांवर कारवाईच्या मोहिमेत सक्रिय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ जून २०२६ रोजी रात्री संबंधित अधिकारी व कर्मचारी एका हॉटेलमध्ये मेजवानी केल्यानंतर नांदेडकडे जात असताना सलगरा परिसरात एका हायवा वाहनाचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा करण्यात येत असून, पैशांची मागणी करताना अश्लील भाषेचा वापर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा आहे.
या घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पडताळणीत मंडळ अधिकारी पी. व्ही. हाके यांचे कार्यक्षेत्र जाहूर, ग्राम महसूल अधिकारी पी. एस. शिंदे यांचे जांब, तर एस. एम. मैड यांचे चांडोळा असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला. तसेच सत्यम हाके हे कार्यालयीन कर्मचारी असूनही ते या कारवाईत सहभागी असल्याचेही सांगितले जात आहे.
याशिवाय तहसीलदार धनंजय राऊत यांनी दि. १ जून २०२६ रोजी गठित केलेल्या गौण खनिज तपासणी पथकाच्या आदेशात संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाराने त्यांनी सलगरा परिसरात कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा केल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल मंत्रालय स्तरावरही घेतली जात असल्याची चर्चा असून, जिल्हाधिकाऱ्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button