सत्तेचा माज! खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना भररस्त्यात जीवे मारण्याची धमकी; पोलिसांसमोरच उघड गुंडगिरी

▫️प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले पत्र!
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क / मुंबई २५ जून २६
राज्यात सत्तेचा उन्माद कोणत्या थराला गेला आहे, याचा एक अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणा प्रकार नुकताच समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अक्षरशः रस्त्यावरची गुंडगिरी करत पोलिसांसमोरच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्रकारांनी केवळ एक राजकीय प्रश्न विचारला असता, खासदारांचा तोल सुटला आणि त्यांनी अत्यंत गलिच्छ भाषेचा वापर करत थेट ‘मारून टाकेन’ अशी अरेरावी केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
“कॅमेरा बंद कर, नाहीतर…” मिळालेल्या माहितीनुसार, एका राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार खासदार पाटील यांच्याकडे गेले होते. मात्र, प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांच्या अंगात सत्तेचा अहंकार संचारला. पत्रकारांवर धावून जात ते संतापाने म्हणाले, “कॅमेरा बंद कर नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे. परत आलात तर मारून पाठवेन, मी हे पोलिसांसमोर सांगतोय.” एवढ्यावरच न थांबता त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन, “माझ्या मागे उगाच बोटं घालू नका, परत आलात तर मारून टाकेन,” अशी धमकीही दिली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खासदारांनी ही गुंडगिरी आणि धमक्या पोलिसांच्या समक्ष दिल्या आहेत. स्वतः खासदारच “मी पोलिसांसमोर सांगतोय” असे म्हणत कायद्याला आणि गृहखात्याला खुलेआम आव्हान देत असताना खाकी वर्दी मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. यामुळे गृहविभागाचा वचक राहिला आहे की नाही, आणि राज्यात सर्वसामान्यांसह पत्रकार सुरक्षित आहेत का, असा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या झुंडशाहीचा तीव्र निषेध नोंदवत ‘प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ’चे तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अत्यंत कडक शब्दांत एक अधिकृत पत्र देण्यात आले आहे. या पत्राद्वारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
सत्तेत बसलेल्या लोकप्रतिनिधीने कायद्याचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच गुंडाची भाषा वापरणे हे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी भाई आसद बल्खी यांनी पत्रात केली आहे. सरकारने जर या झुंडशाहीला पाठीशी घातले आणि तत्काळ कारवाई केली नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी संपूर्ण राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
आता राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृहखाते लोकशाहीचा अपमान करणाऱ्या खासदारावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? सत्तेचा माज उतरवणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.



