“तुलाही वर पाठवीन!” आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी; शहीद गोविंद पानसरेंबद्दल अपमानास्पदभाषा आणि प्रकाशकाला खुनाची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल!

मुखेड /प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २३ एप्रिल २६
महाराष्ट्राच्या वैचारिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध साहित्यिक शहीद गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संभाषणाची कथित ऑडिओक्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमव्ही की घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून गोविंद पानसरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि द्वेषयुक्त शब्दांचा वापर केला. व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी पानसरे यांच्याबद्दल बोलताना “पानसरे हरामखोर होते”आणि “गोविंद पानसरे यांना हाल हाल करून वर पाठवले” अशी प्रक्षोभक विधाने केली. इतकेच नव्हे तर, “प्रशांत आंबी तुलाही त्यांच्याबरोबर वर पाठवीन” अशी थेट धमकीही दिल्याचे या ऑडियो क्लिप मधून समोर येत आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर “विचारांना घाबरून धमक्या? ही लोकशाहीची लाज!” अशा शब्दांततीव्र पडसाद उमटत आहेत. ही केवळ वैयक्तिक धमकी नसून संविधानाने दिलेल्या विचार स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. शहीद गोविंद पानसरेयांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांवर अशा प्रकारे दबाव टाकणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचेमत अभ्यासक व्यक्त करत आहेत.
या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत
▫️चिथावणीखोर वक्तव्य आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर तातडीनेफौजदारी गुन्हा दाखल करावा.
▫️धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधीला तात्काळ अटक करून कायद्याचा वचक निर्माण करावा.
◽️ विचारस्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींना कडक कायदेशीर शिक्षा व्हावी.
“पानसरे विचार जिवंत राहतील!”
सोशल मीडियावर #JusticeForPansare, #StopThreats आणि#IStandWithPrashantAmbe हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. “विचारांचा आवाज दाबला जाणार नाही, पानसरे विचार जिवंत राहतील!” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मार्च २०२४ मध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. जुलै २०२५ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मराठा समाजात संताप व्यक्त झाला होता, ज्यावर नंतर त्यांनी माफी मागितली. १९८७ मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा, पोलिसांना भ्रष्ट म्हणणे आणि मतदारांबद्दल “त्यांना फक्त दारू आणि मटण हवे असते” असे विधान करणे, अशा अनेक कारणांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत.



