नांदेडमध्ये ‘रक्ताची होळी’ सुरूच! ७० तासांत ५ हत्या; गुन्हेगारांसमोर पोलीस हतबल, आता पुढचा बळी कोणाचा?

▫️आज पहाटे श्रीनगरमध्ये सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या; गुंडांच्या धुमाकूळाने नांदेड हादरले
नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६)
नांदेड शहरात कायद्याचे राज्य संपून गुंडांची दहशत सुरू झाली आहे की काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. गेल्या ७० तासांत शहरात तब्बल ५ खून झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शनिवारी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर आणि काल रज्जूसिंगच्या हत्येनंतर, आज सोमवार, ६ एप्रिल रोजी पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर हा पहाटेच्या सुमारास श्रीनगर परिसरातून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गाठले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात सोनूचा जागीच मृत्यू झाला. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आणि दहशतीचे वातावरण पसरले.
नांदेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रक्ताचा सडा पडला आहे. ७० तासांच्या आत एकामागून एक ५ हत्याहोणे, ही पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सर्वात मोठी चपराक आहे. शहरात ‘सिंघम‘ अधिकारी असूनही गुन्हेगार राजरोसपणे हत्या करत सुटले आहेत. श्रीनगरसारख्या गजबजलेल्या भागात पहाटेच्या सुमारास हत्या होते, यावरून गुन्हेगारांना खाकी वर्दीचा कसलाही धाक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सोनू कल्याणकरच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नांदेडमध्ये सुरू असलेल्या या‘किलिंग सिरीज‘मुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली आहे. व्यापाऱ्यांपासून ते सामान्य नोकरदारांपर्यंत प्रत्येकजण स्वतःच्या सुरक्षेबाबत काळजीत आहे. या घटना रोखण्यात पोलीस अपयशीठरत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ठसेतज्ज्ञ आणिश्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढलाजात आहे. परिसरात सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी, “आता पुढचाबळी कोणाचा?” या भीतीने नांदेडकरांची झोप उडाली आहे.



