सामाजिक

पोलीस व अधिकाऱ्यांसमोरच शासकीय कामात अडथळा; कारवाईच्या मागणीसाठी जाहुर कब्रस्तान कमिटी उपोषणाला

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क देगलूर: २१ जुलै २६

मौजे जाहुर ता. मुखेड, जि. नांदेड येथील मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीत जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड (कब्रस्तान)’ समितीच्या वतीने आज, २० जुलै रोजी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, जाहुर येथील मुस्लिम कब्रस्तानच्या जागेची वक्फ बोर्डाकडे रीतसर नोंदणी झालेली आहे. या जागेची भूमी अभिलेख विभागाकडून शासकीय मोजणी सुरू होती. यावेळी पोलीस बंदोबस्त, भूमी अभिलेख कर्मचारी व तलाठी उपस्थित होते. मात्र, मोजणी सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी (रमाकांत व्यंकट हिवराळे, शफी हसनसाब शेख, रसूल हसनसाबशेख, निजाम हसनसाब शेख, विनायक शामसुंदर बोडके, उमाकांत शामसुंदर बोडके, बंडू बापुराव बोडकेआदी) एकत्र येत ‘गट नं. मध्ये मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नाही, या ठिकाणी आमची जमीन आहे‘ असा दावा करून मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केला.

पोलीस बंदोबस्त आणि जबाबदार अधिकारी उपस्थित असतानाही शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, अधिकारी मोजणी न करताच निघून गेले, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या बेजबाबदार पणाबद्दल संबंधित भूमी अभिलेख अधिकारी, जाहुरचे तलाठी, इतर अधिकारी आणि मोजणीत अडथळा आणणाऱ्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कब्रस्तान कमिटीने केली आहे.

या मागण्या मान्य न झाल्याने वक्फ संस्थेचे अध्यक्ष दिलावर हैदरसाब शेख आणि इतर सदस्यांनी पूर्वनियोजित इशाऱ्यानुसार उपजिल्हाधिकारी कार्यालय (देगलूर) येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. “उपोषणस्थळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा थेट इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती नांदेडचे जिल्हाधिकारी, मुखेडचेत हसीलदार आणि देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button