दापका राजा-जळकोट मार्गावरील रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करा; नागरिकांचा प्रशासनाला इशारा
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १२ सप्टेंबर २६
दापका राजा ते जळकोट मार्गावरील सुमारे १ किलोमीटरचे रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डे आणि चिखलमय रस्त्यामुळे शाळकरी मुले, महिला, शेतकरी आणि रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, पावसाळ्यात येथे अपघातांचा धोका अधिकच वाढणार आहे.
शासनाच्या ग्रामीण विकासाच्या दाव्यांना या १ किलोमीटरच्या अपूर्ण रस्त्याने हरताळ फासला आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी या खराब रस्त्यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. “मोठ्यांचे प्रश्न नंतर सोडवा, पण किमान शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांसाठी तरी हा रस्ता लवकर पूर्ण करा; प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ आश्वासने न देता, दुर्घटना घडण्यापूर्वीच जागे होऊन या रखडलेल्या कामाची प्रत्यक्ष तारीख जाहीर करावी आणि रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



