जांब धान्य ट्रक प्रकरण: मुखेड पोलिसांचा तपास सुरू, पुरवठा विभागाच्या अहवालाकडे लक्ष; काळा बाजार की शेतकऱ्याचा माल?

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १८ सप्टेंबर २६
मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडलेल्या धान्याच्या ट्रक बाबतचे गूढ अद्याप कायम आहे.
सदर ट्रक मुखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, त्यातील तांदूळ हा शेतकऱ्याचा आहे की काळ्या बाजारात जाणारा आहे, याबाबत शहरात उलट–सुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुखेड पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून विचारपूस केली असता, या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘एमएच २६ ए.डी. १५२७‘ क्रमांकाचा हा ट्रक कंधार मार्गे संगारेड्डी येथे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर हा विषय समोर आला. सध्या पोलीस प्रशासन संबंधित पुरवठा विभागाला पत्र देऊन याधान्याच्या मालकी व वाहतुकीच्या कायदेशीर बाबींची माहिती घेत आहेत. अधिकृत तपासणी व पुरवठाविभागाच्या अहवालानंतरच या प्रकरणात रेशनच्या काळ्या बाजाराचे रॅकेट उघडकीस येणार की अन्यकाही, याबाबतचा अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.



