नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई; ५५ गुन्हे दाखल तर ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: १८ सप्टेंबर २६
जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार १५ सप्टेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी विशेष ‘मास रेड’ मोहीम राबविण्यात आली. या धडक कारवाईत दारूबंदी, मटका-जुगार आणि गुटखा यांसारख्या अवैध व्यवसायांवर छापे टाकण्यात आले असून, संपूर्ण जिल्ह्यात एकूण ५५ गुन्हे दाखल करत ७४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तसेच, या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ८२ हजार २६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या मोहिमेत प्रामुख्याने दारूबंदीच्या ४६ प्रकरणांत ४८ जणांवर कारवाई करत १ लाख ४९ हजारांचा माल जप्त करण्यात आला. मटका व जुगाराच्या ८ प्रकरणांत २५ आरोपींवर कारवाई करून ६९ हजार २५० रुपयांचा, तर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (ई.सी. ॲक्ट) एका कारवाईत १ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही विशेष मोहीम अपर पोलीस अधीक्षक आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला किंवा ‘डायल ११२’ वर द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.



