फुले , शाहू , आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत सामाजिक समता प्रस्थापित करतो :-डॉ. अजय गव्हाणे

मुखेड :-दि १८ एप्रिल २५
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आँनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजय गव्हाणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून जगातील अस्थिरता थांबविण्यासाठी भारतीय विचारवंत अभ्यासले पाहिजेत. भारतीय शिक्षण भोगापेक्षा त्यागाचे महत्त्व शिकवते . प्रामुख्याने फुले , शाहू , आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत सामाजिक समता प्रस्थापित करुन जगाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख वक्ता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अजय गव्हाणे , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते हे होते . सूत्रसंचालन डॉ. संतोष शेंबाळे तर आभार प्रदर्शन डॉ. शिवसर्जन टाले आणि तंत्र सहाय्य श्रीराम पताळे यांनी केले . डॉ. गव्हाणे यांनी समता नायकाच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव या महाराष्ट्रात कसा निर्माण झाला . समग्र भारताच्या ज्ञानाचा सूर्य या देशात कसा कार्य करीत आहे . स्वातंत्र्य , समता , बंधुता , न्याय विश्वशांतीची प्रेरणा याच भूमीची शिकवण आहे असे विचार व्यक्त केले .
अध्यक्षीय भाषणात डॉ. अडकिणे यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकीच एक हा उपक्रम आहे . भारतीय संस्कृती ही जगाला आपापसातील मतभेद विसरून पारस्पारिक सौहार्दाचे शिक्षण देते . फुले , शाहू , आंबेडकर यांनी देशाला गौरव स्थान मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली आहे असे विचार मांडले . आँनलाईन गुगल मीटवर बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .



