CBSE चा ऐतिहासिक निर्णय! आता शाळांमध्ये ‘मासिक पाळी आरोग्य केंद्र’ अनिवार्य

▫️नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू; विद्यार्थिनींचे शिक्षण आता राहणार अखंडित
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०३ एप्रिल
मासिक पाळीदरम्यान उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी आणि संकोचामुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट सुटते किंवा त्यांना शाळा चुकवावी लागते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता सर्व संलग्न शाळांमध्ये ‘मासिक पाळी आरोग्य केंद्र’ सुरू करणे अनिवार्य करण्यात आले असून, नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्येही याचीप्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या उपक्रमांतर्गत पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेतच सॅनिटरी नॅपकिन, सुरक्षित स्वच्छता सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. अनेकदा पाळीच्या दिवसांत योग्य सुविधा नसल्यामुळे मुली शाळा टाळतात, मात्र आता शाळेतच स्वतंत्र आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने मुलींची उपस्थिती वाढण्यास मदत होणार आहे.
CBSE च्या नवीन नियमावली नुसार, या केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसर मशीन आणि वापरलेल्या नॅपकिनच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर सुविधा असणे बंधनकारक आहे. स्वच्छतेवर विशेष भरदिला जाणार असून आरोग्य तज्ज्ञांकडून विद्यार्थिनींना वेळोवेळी मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक CBSE शाळांनी या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली असून, काही शाळांनी आपला प्राथमिक अहवालही शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणार असून पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.



