चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंते निलंबित, तिघांना कारणे दाखवा नोटीस

▫️देगलूर नाका दुर्घटनेनंतर महापालिकेची धडक कारवाई; चौकशी अहवालात निष्काळजीपणा उघड
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ एप्रिल २६
शहरातील देगलूर नाका परिसरात साचलेल्या पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी अवघ्या २४ तासांत कडक कारवाई करत दोन अभियंत्यांना निलंबित केले असून, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या दुर्दैवी घटनेत अदनान मोहम्मद फिरोज (१०), मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (१३), सय्यद इरफान सय्यद फिरोज (१३) आणि आयान इब्राहिम बागवान (११) या चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. १६ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर इस्लामपुरा भागातील ही मुले घरी जात असताना प्रचंड उष्णतेमुळे पोहण्यासाठी देगलूर नाका येथील एमजीआर गार्डनजवळील खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरली. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने चारही मुलांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेनंतर आयुक्तांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने १७ एप्रिल रोजी अहवाल सादर केला. अहवालात विकासकामांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या निष्कर्षांच्या आधारे उपअभियंता शिवकन्या जायभाये आणि कनिष्ठ अभियंता किरण सूर्यवंशी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, उपअभियंता प्रकाश कांबळे आणि कनिष्ठ अभियंता जकी उल्लाखान यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
याशिवाय, या दुर्घटनेस जबाबदार ठरलेल्या मे. गुरु रामदास कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराला मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश महापालिकेमार्फत देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व विकासकामांमध्ये सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



