इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रांवरील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरला नांदेडमध्ये विशेष शिबिर; लातूर विभागीय मंडळाचा पुढाकार

विद्यार्थी व पालकांना उपस्थित राहण्याची गरज नाही
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड: २८ सप्टेंबर २६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ‘बोर्डशाळेच्या दारा‘ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वसंतनगर, नांदेड येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वी (HSC) परीक्षेतील विद्यार्थ्यांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक तसेच जन्मस्थळातील चुका दुरुस्त करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. प्रस्तावातील त्रुटी जागीच सांगून आवश्यक प्रवेश निर्गम तपासूनपात्र प्रस्ताव त्वरित स्वीकारले जाणार आहेत.
लातूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिलेल्या परिपत्रकानुसार, नांदेड जिल्ह्यातील सर्वमान्यता प्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी स्वतः किंवा शाळेतील जाणकार जबाबदार प्रतिनिधीसह मूळ अभिलेख, प्रवेश निर्गम रजिस्टर आणि परिपूर्ण प्रस्तावासह नियोजित वेळेत उपस्थित राहावे.
या शिबिरासाठी पालक किंवा विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून केवळ शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनीच प्रस्ताव घेऊन हजर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या शिबिरात प्रस्तावांचा जागेवरच तातडीने निपटारा व्हावा यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच लातूर विभागीय मंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणारआहेत. गुणपत्रिका व प्रमाणपत्रांमधील त्रुटी वेळेत दुरुस्त करून घेण्यासाठी शाळांनी या संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



