क्राईम

मुखेडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! तहसील कार्यालयासमोरूनच विना नंबरच्या ‘हायवा’ गाड्यांची अवैध रेती वाहतूक; पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १७ मे २६

 शहरात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र वाळूमाफियांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. आज रविवारची सुट्टी साधून मुखेड शहरातील मुख्य रस्ते आणि चक्क तहसील कार्यालय समोरून क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) अवैध रेती घेऊन जाणाऱ्या, विना नंबरच्या ‘हायवा‘ टिपर गाड्यांची सर्रास वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जागरूक कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांना प्रत्यक्ष माहिती देऊनही कारवाई मात्र‘शून्य‘ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुखेड शहरात सुरक्षेच्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या नावाखाली प्रत्येक मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यांच्या नाकाखालून दिवसाढवळ्या नंबर नसलेलेहे ‘यमदूत‘ म्हणजेच ओव्हरलोड हायवा टिपर सुसाट धावत आहेत. हे कॅमेरे फक्त सामान्य वाहनधारकांना दंड ठोठावण्यासाठी आहेत की काय? असा संतप्त सवाल आता मुखेडची जनता विचारत आहे. वाळू माफियांच्या या गाड्या सीसीटीव्हीत कैद होऊनही प्रशासन आंधळेपणाचे सोंग का घेत आहे, हा मोठा प्रश्न आहे.

आज रविवार असल्याने महसूल आणि पोलीस प्रशासन सुट्टीच्या मूडमध्ये असेल, याचा अचूक अंदाजवाळू माफियांनी लावला होता. शहरातून अवैध रेतीचे हायवा जात असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी जात, पोलिसांना फोनवरून संपर्ककरून या अवैध वाहतुकीची माहिती दिली. परंतु, पोलिसांनी घटनास्थळी फिरकण्याची तसदीही घेतलीनाही. पोलिसांच्या या ‘ढिम्म‘ आणि संशयास्पद भूमिकेमुळे “पोलीस आणि वाळू माफियांमध्ये काही ‘अर्थपूर्ण’ साटेलोटे तर नाही ना?”अशी जाहीर चर्चा आता चौकाचौकात सुरू झाली आहे.

मुखेड परिसरात होत असलेल्या या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीबाबत यापूर्वी अनेक वेळा वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सुजाण नागरिकांनी लेखी तक्रारीही केल्या आहेत. परंतु, प्रत्येक वेळी थातुरमातूर कारवाईचे नाटक करून या माफियांचे रॅकेट पुन्हा सुरू केले जाते.

या विना नंबरच्या आणि ओव्हरलोड धावणाऱ्या हायवा गाड्यांमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झालीआहे, तसेच अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरदखल घेऊन तात्काळ मुखेडमधील या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता तरी कुंभकर्णी झोपेत असलेले पोलीस प्रशासन जागेहोणार की वाळू माफियांसमोर लोटांगण घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button