नांदेडमध्ये १५,५६९ बनावट जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा

▫️झारखंडमधून पाच जण अटकेत, मास्टरमाइंड बिहारचा
नांदेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६
नांदेड : डिजिटल व्यवस्थेचा गैरवापर करत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्वर(लोकसंख्या सुमारे १५००) या गावातून तब्बल १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रेकाढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी झारखंडमधून पाचजणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार बिहारमधील असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आहे.
१५ दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड दौऱ्यात हा प्रकार उजेडात आणला होता. झारखंडमधील एका व्यक्तीने सावळेश्वर येथून काढलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. सुरुवातीला उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची सूत्रे लोहा येथील पोलिस निरीक्षक नवनाथ आयलाने यांच्याकडे देण्यात आली. सायबरपथकाच्या मदतीने झारखंडमधील गढवा येथून जितेंद्र कुमार सिंह, महेंद्र प्रताप सिंह, ओमप्रकाश मिश्रा, लक्ष्मी पंडित, सुमित कुमार सिंह व सतीश कुमार साहू यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी सध्यापोलिस कोठडीत आहेत.
सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवरील सावळेश्वर ग्रामपंचायतीचा यूजर आयडी वपासवर्ड झारखंडमधील आयपी अॅड्रेसवरून हॅक करण्यात आला होता. मे ते नोव्हेंबर २०२५ याकालावधीत १५ हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. या रॅकेटमध्ये व्हॉट्सअॅपग्रुप, दलाल व सायबर कॅफे चालकांचा सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, झारखंड, तेलंगणा, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांपर्यंत या रॅकेटची व्याप्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

