मुखेड शहराचा बंद पाणीपुरवठा त्वरित सुरू करा, अन्यथा उद्या नगर परिषदेत तीव्र आंदोलन; भाजप नगरसेवकांचा इशारा

▫️तांत्रिक बिघाड आणि कंत्राटदाराच्या बिलाबाबत आक्षेप
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ३० सप्टेंबर २६
मुखेड शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज, ३० सप्टेंबर रोजी मुखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा सुरू न झाल्यास उद्या, १ ऑक्टोबर रोजी नगर परिषद कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवकांच्या वतीने देण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २६ सप्टेंबरपासून कुंद्राळ येथील वॉटरसप्लायमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे मुखेड शहराचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. आजतागायत चार दिवस उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
यापूर्वी अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कुंद्राळ कॅम्प येथील स्टार्टरचे दुरुस्ती काम करण्यात आले होते, तरीही पुन्हा स्टार्टरमध्ये बिघाड कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी आणि कंत्राटदाराचे काम पूर्ण समाधानकारक झाल्याशिवाय त्याचे थकीत बिल अदा करण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी नगरसेवकांनी केली आहे.
या निवेदनावर नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजकुमार पांडुरंग बामणे, गटनेते नागनाथ बळीराम लोखंडे, पाणीपुरवठा सभापती विनोद शामराव दंडलवाड, नगरसेविका निलावती शिवाजी पाटील, नगरसेवक मैनोद्दिन चांदसाब शेख, नगरसेविका रेखा दीपक लोहबंदे, हेमंत गंगाधरराव घाटे, शकुंतला रामचंद्र चव्हाण, स्नेहा संजय तमशेट्टे, जयश्री शंकरराव गजलवाड, गजानन वीरभद्र लंगेवाड, शेख मुस्तफा उर्फ हारूण मेहबूबसाब, अंजली अनिल जाजू आणि अंजली करण रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



